Slide 1 of 1

आमच्याविषयी

श्री स्वामी समर्थ नामस्मरण सेवा (मलेशिया)

"श्री स्वामी समर्थ" या नामातच एक अपार शक्ती सामावलेली आहे. याच नामाच्या ओढीतून, धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आमच्या "श्री स्वामी समर्थ नामस्मरण सेवा" या सेवेची स्थापना झाली.

भारतापासून हजारो मैल दूर, मलेशियात राहणाऱ्या आपल्या सर्वांच्या मनात स्वामींबद्दलची भक्ती तेवढीच खोल आहे, जेवढी भारतातील भक्तांच्या मनात आहे. पण परदेशात राहताना, एकत्र येऊन नामस्मरण करण्याची, सेवा करण्याची जी संधी भारतात सहज मिळते, ती इथे दुर्मिळ होती.

हीच उणीव भरून काढण्याच्या भावनेतून, अवघ्या 7-8  स्वामीभक्तांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही स्वामी नामस्मरणाची..सेवा आता तब्बल 50 पेक्षा अधिक.सेवेकरयांनी.जोडली गेली आहे.आणि दिवसागणिक ही संख्या वाढतच जात आहे.  

स्वामींच्या नामस्मरणाची ताकद खरंच.इतकी मोठी आहे.की ती शब्दात मांडणे खरंतर खूप कठीण , आणि म्हणूनच की काय परदेशात राहून सुद्धा स्वामींनी  दिलेल्या.एका वचनाचा - "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे"  अनुभव - इकडचा प्रत्येक स्वामी भक्त पदोपदी घेत असतो. 

मायभूमीपासून दूर असलो, तरी स्वामींचे नाम आपल्याला एका धाग्यात बांधून ठेवते. या सेवेत सहभागी झालेल्या अनेकांना शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आयुष्यातील कठीण प्रसंगी स्वामींच्या कृपेचा प्रत्यय आला आहे - काहींनी याला चमत्कार म्हटले, काहींनी मनःशांती म्हटले, पण प्रत्येकाच्या अनुभवात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे -  स्वामींचे अस्तित्व.

आपणही या नामस्मरण सेवेत सहभागी व्हा, स्वामींचे नाम घ्या, आणि अनुभवा ती अनुभूती जी शब्दांत मांडणे कठीण आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

आमची सेवा पद्धती

स्वामींच्या कृपाशीर्वादाने चालणारी ही नामस्मरण सेवा एका ठराविक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते, जेणेकरून प्रत्येक भक्ताला त्यातील पावित्र्य व भावार्थ अनुभवता यावा.

सेवेचा क्रम - आमची सेवा सुरू होते ती श्री गणेश अथर्वशीर्षाने, त्यानंतर स्वामी स्तवन, स्वामी तारक मंत्र, स्वामी अष्टक स्तोत्र, दत्त बावन्नी, काळभैरव अष्टक स्तोत्र, सिद्ध मंगल स्तोत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि स्वामी मंत्र यांच्या पठणाने पुढे सरकते. यानंतर स्वामींचा हवन केला जातो आणि शेवटी स्वामींच्या आरतीने सेवेची सांगता होते. संपूर्ण सेवा साधारण १ तासाची असते.

सेवेचे स्थळ व वेळ - ही सेवा दर पंधरा दिवसांनी, शनिवारी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत आयोजित केली जाते. ज्या स्वामीभक्तांना आपल्या घरी ही सेवा आयोजित करण्याची इच्छा असते, ते आधीच आपले नाव नोंदवतात, आणि त्यांच्याच निवासस्थानी पुढील सेवेचे आयोजन होते.

महाप्रसाद - सेवेनंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांना घेता येतो. हा महाप्रसाद त्या-त्या यजमान भक्ताकडून प्रेमाने व श्रद्धेने बनवला जातो. मात्र हे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, महाप्रसाद ठेवणे ही अजिबात सक्ती नाही - ती पूर्णतः यजमानाची इच्छा व सोय यावर अवलंबून असते. काही भक्त आपापल्या आवडीनुसार व सोयीनुसार इतर प्रसादाचे पदार्थही आणतात. या सेवेत फक्त आणि फक्त भक्तांनी काही क्षण उपस्थित राहून स्वामी नामस्मरणात सहभागी व्हावे, एवढीच अपेक्षा असते.

बालोपासना - या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बालोपासना. सेवेसाठी येणाऱ्या लहान मुलांनाही यात सामावून घेतले जाते - ते स्वतःहून एखादा छोटा मंत्र म्हणतात, एखादी पौराणिक गोष्ट सांगतात किंवा आपल्या संस्कृती व धर्माशी नाते जोडणारी कोणतीही गोष्ट मांडतात. यामुळे लहान वयातच मुलांमध्ये स्वामींबद्दलची श्रद्धा व आपल्या मुळांशी असलेली नाळ अधिक घट्ट होते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

"हम गया नाही, जिंदा है" - स्वामींचं अभय वचन

अक्कलकोटच्या मठात एक दिवस स्वामी समर्थ महाराज समाधिस्त होण्याच्या तयारीत होते. भोवती जमलेले भक्त हमसून हमसून रडत होते. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. "महाराज, तुम्ही गेल्यावर आमचं कसं होणार? आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं?" - प्रत्येकाच्या मनात हाच एक प्रश्न होता.

त्यावेळी स्वामींनी अत्यंत करुणामय स्वरात एक वचन दिलं - "हम गया नाही, जिंदा है!"

आणि आजही, दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी हे वचन तसंच्या तसं खरं ठरताना दिसतं. स्वामी शरीराने या भौतिक जगतात नसले  तरीही त्यांचं अस्तित्व, त्यांची कृपादृष्टी आजही तितकीच जिवंत आहे.

एका भक्ताची गोष्ट सांगतो -

एकदा एक स्त्री अत्यंत निराश होऊन, सगळीकडून हरलेली, आपल्या लहान मुलाला घेऊन एका अनोळखी गावात पोहोचली. जवळ पैसे नव्हते, राहायला जागा नव्हती, आणि रात्रही होत आलेली. ती एका पारावर बसून फक्त एकच नाव घेत होती - "स्वामी समर्थ... स्वामी समर्थ..."

थोड्याच वेळात एक वृद्ध माणूस तिथून जाताना थांबला. काहीही न विचारता म्हणाला, "बाई, इतक्या रात्री इथे राहू नका, चला माझ्या घरी." त्या रात्री त्या माउलीला व मुलाला निवारा मिळाला, जेवण मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती आभार मानायला गेली, तेव्हा तो माणूस तिथे नव्हताच. आजूबाजूच्या कोणालाही असा कोणी माणूस माहीत नव्हता.

त्या क्षणी तिला उमगलं - स्वामी स्वतः तिथे आले होते, तिचं रक्षण करायला.

अशा असंख्य कहाण्या आज मलेशियापासून भारतापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत.

कोणाला अवघड प्रसंगी अचानक मदतीचा हात मिळतो, कोणाच्या असाध्य आजारात अनपेक्षित बरं वाटू लागतं, तर कोणाच्या मनात अचानक अशी शांतता दाटून येते, जी शब्दांत सांगताच येत नाही.

स्वामींनी दिलेलं वचन कधीच पोकळ नव्हतं. ते आजही, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात, कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या क्षणी, आपली उपस्थिती दाखवून देतात. फक्त गरज असते ती श्रद्धेने त्यांचं नाम घेण्याची.

कारण स्वामी नेहमी  म्हणतात - "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे."

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

सेवेमागील हेतू - एक आंतरिक प्रेरणा

"अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय!"

हे नाम जितकं साधं, तितकंच त्यात दडलेलं सामर्थ्य अगाध आहे. भारतभूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला अक्कलकोट, गाणगापूर यांसारख्या पवित्र स्थानांची, तिथल्या चैतन्यमय वातावरणाची अनुभूती सहज घेता येते. पण आपण जेव्हा मायभूमीपासून हजारो मैल दूर, परदेशात - या मलेशिया भूमीत स्थायिक होतो, तेव्हा ही संधी किती दुर्मिळ होऊन जाते, याची जाणीव मला स्वतःला झाली.

स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आज संपूर्ण जगभर पसरलेले आहेत, आणि मलेशियाही याला अपवाद नाही. पण इथे राहणाऱ्या असंख्य लोकांना कदाचित अजूनही ठाऊक नसेल की, "स्वामी समर्थ" हे नाव नेमकं कोण आहे, त्यांचं अधिष्ठान काय आहे, त्यांची शक्ती किती अगाध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे - त्यांची प्रार्थना करण्याचा मार्ग किती सोपा आहे. फक्त त्यांचं नाम घ्यायचं - "श्री स्वामी समर्थ" - एवढंच!

आणि हेच नामस्मरण जेव्हा मनापासून, श्रद्धेने केलं जातं, तेव्हा शरीरात, मनात आणि आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते. ही ऊर्जा शब्दांत मांडणं कठीण आहे, पण ती अनुभवता मात्र नक्कीच येते - मनाला शांती मिळते, विचारांना दिशा मिळते, आणि आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर स्वामींचा वरदहस्त जाणवतो.

हाच अनुभव, ही अनुभूती, जी आज केवळ भारतातील भक्तांपुरती मर्यादित न राहता, इथे मलेशियातही पोहोचावी - ज्यांना अजून स्वामींची ओळख झालेली नाही, त्यांच्यापर्यंत ही सेवा घेऊन जावी, हीच माझी मनापासूनची इच्छा आणि तळमळ आहे.

खरं सांगायचं झालं तर, हे कार्य घडवून आणण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही - ही फक्त आणि फक्त स्वामींचीच इच्छा आहे, आणि ते स्वतःच माझ्या माध्यमातून हे कार्य घडवत आहेत. या पवित्र प्रवासाची सुरुवात करण्यासाठी स्वामींनी मला निवडलं, यापेक्षा भाग्याची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते?

म्हणूनच, मी फक्त एक निमित्तमात्र आहे. करविता-धरविता तोच आहे, आणि ही सेवा त्याच्याच आशीर्वादाने, त्याच्याच इच्छेने अखंड सुरू राहील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

अनंत आहे तुझी माया, अपार आहे तुझी कृपा - श्री स्वामी समर्थ महाराज की जय! जय जय स्वामी समर्थ 🙏

 

सेवेकरी परिवार

स्वामींच्या कृपाशीर्वादाने ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ज्या सेवाभावी हातांनी योगदान दिले, त्या सर्व स्वामीभक्त सेवेकऱ्यांची सूची

संपूर्ण टीम पहा

भक्तीमय क्षण

भक्तीमय कार्यक्रम

स्वामींच्या कृपेने आयोजित नामस्मरण, सत्संग, भजन, पारायण आणि विविध आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि भक्तीचा दिव्य अनुभव घ्या. टीप: सर्व कार्यक्रमांसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

29JUL

Tushar Karande

Gurupornima vishesh puja

8AUG

Tejas Wani

Monthly
15AUG

Tushar Karande

Satyanarayan & Swami Namhsmran

29AUG

Shamika Pravin Borsea

5SEP

Shital Mhatre

14SEP

Sujata Srinivas Gundale

Ganpati aarti

आमच्याशी संपर्क साधा

श्री स्वामी समर्थ नामस्मरण सेवेशी जोडले जाण्यासाठी, नामस्मरण, सत्संग, आगामी कार्यक्रम किंवा सेवाकार्यांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा. आम्हाला आपल्याशी जोडून आनंद होईल आणि लवकरच आमच्या टीमकडून आपल्याशी संपर्क साधला जाईल.